भारतीय संविधानाने प्रत्येकाला विविध प्रकारचे हक्क व अधिकार दिलेले आहेत. मात्र दैनंदिन जीवन जगत असताना मुला-मुलींनी आपल्या हक्कासोबतच कौटुंबिक व सामाजिक जबाबदार्या देखील सांभाळल्या पाहिजेत‘ असे मत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अंबाजोगाईचे चंद्रमोहन खारकर यांनी व्यक्त केले. ते खोलेश्वर महाविद्यालयात जागतिक बालदिनानिमित्त आयोजित एकदिवसीय कायदेविषयक शिबीरात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. आज दिनांक 22 नोव्हेंबर 2019 रोजी तालुका विधी समिती व वकील संघ अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाशिप्र संस्थेच्या स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अॅड.किशोर गिरवलकर यांची उपस्थिती होती तर मंचावर वकिल महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.भारजकर, जिल्हा व सत्र न्यायालय अंबाजोगाईचे सरकारी वकील अॅड.अशोक कुलकर्णी, अॅड.कल्याणी विर्धे, खोलेश्वर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड.मकरंद पत्की, जिल्हा न्यायालयाचे अधिक्षक कांबळे , लिपीक एस.आर.गुंड तसेच खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे आपल्या मार्गदर्शनात खारकर म्हणाले की, मुल आईच्या गर्भात असल्यापासुनच त्याचे हक्क व अधिकार सुरू होतात. भारतीय संविधानाने बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, बालकामगार विरोधी संरक्षणाचा अधिकार, लैंगिक शोषणाविरूधचा अधिकार असे अनेक अधिकार दिलेले आहेत. मात्र या हक्क व अधिकारासोबतच आपण आपली कर्तव्ये व जबाबदार्या देखील नीटपणे पार पाडल्या पाहिजेत. मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर मुलांनी करू नये असे विचार त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी अॅड.कल्याणी विर्धे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्या म्हणाले की, विद्यार्थ्यांना मुलांचे व मुलींचे हक्क काय आहेत. याची जाणीव करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. जन्मास आलेल्या प्रत्येक जीवास हक्क प्राप्त होतात. हे हक्क कायद्याने दिलेले आहेत. हे सर्व हक्क त्यांना मिळवून देणे हे आपल्या सर्वांचे कार्य आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात कौटुंबिक संवाद हे हरवत चालले आहेत. अशा परिस्थितीत हे संवाद वाढवले पाहिजेत असे प्रतिपादन केले. अनेक कायदे व कलमांची माहिती त्यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना करून दिली.
सरकारी वकील अॅड.अशोक कुलकर्णी यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले की, सध्या होत असलेले अनेक कौटुंबिक व सामाजिक वाद मिटविण्याचे काम विधिसमिती करते. प्रत्येकाने सामंजस्याने वागणूक दाखविली तर हे वाद न्यायालयात नेण्याची गरज पडणार नाहीत. ते आपसातच मिटविले जावू शकतात. यासाठी कोणत्याही व्यक्तीवर जर अन्याय अत्याचार होत असेल तर एक साधा अर्ज विधिसमितीकडे देवून त्याला न्याय मिळविता येतो. अध्यक्षीय समारोप करताना अॅड.गिरवलकर म्हणाले की, महाविद्यालयीन वय हे संस्कारक्षम असते. याच वयात अंगी उत्तम संस्कार बाणून आपला विकास केला पाहिजे व मुलांनी सामाजिक जीवन जगत असताना कौटुंबिक व सामाजिक सलोखा राखला पाहिजे. आपले वर्तन हे आदर्श असले पाहिजे, तसेच तरूणांनी व्यसनांपासुन दुर राहून आपला व देशाचा विकास साधला पाहिजे. असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.मकरंद पत्की यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.प्रल्हाद तावरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.सौ.अनिता बर्दापुरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
