ज्येष्ठांची आरोग्य सेवा आदिवासी तरुणांच्या हाती नाशिकच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार रोजगार

नाशिक
२३  विद्यार्थ्यांना ज्येष्ठांच्या आरोग्यसेवेचे प्रशिक्षण;  राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप
आदिवासी विकास विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या   ‘केअर गिव्हर’ अभ्यासक्रमांतर्गत नाशिकमधील २३ आदिवासी तरुणांनी  रुग्णसेवा विषयक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांना रुग्णालय आणि आरोग्यविषयक संस्थांमध्ये नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभाग आणि  ग्रॅण्डेज सर्व्हिसेस प्रा.लि यांच्या विनेज उपक्रमाच्या या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या  महाराष्ट्रातील तरुणांचा पहिला समूह रुग्ण सेवेसाठी सज्ज झाला आहे. नाशिकमधील वणी, जहुले अशा दुर्गम भागातील आदिवासी तरुणांनी तीन महिन्यांचा या  प्रशिक्षणात्मक अभ्यासक्रमात सहभाग नोंदवला होता. या अभ्यासक्रमाचा प्रमाणपत्र प्रदान सोहळा मंगळवारी राजभवन येथे पार पडला.   राज्यपाल विद्यासागर राव  यांच्या हस्ते अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या सोहळ्यासाठी  मनीषा वर्मा  प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र उपस्थित होत्या.
आदिवासी विद्यार्थ्यांना सर्वांगीण सक्षम करण्याकरिता  आदिवासी विकास विभागाच्या वतीने वेगवेगळे प्रयत्न सुरु असतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर नोकरीच्या शोधार्थ फिरावे लागते. अशा वेळी विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम सुरु व्हावा  या हेतूने  ग्रॅण्डेज सर्व्हिसेस प्रा.लि यांच्या विनेज उपक्रमाच्या माध्यमातून ‘केअर गिव्हर’ अभ्याक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक, कळवण आणि जव्हार येथील २४  आदिवासी विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.   National vocational qualificaion framework यांच्या मार्गदर्शनानुसार या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली होती. १८  वर्षे  पूर्ण असलेल्या वयोगटातील आणि इयत्ता  दहावी  उत्तीर्ण झालेले उमेदवार तीन महिन्यांच्या  प्रशिक्षणासाठी पात्र ठरवण्यात आले होते. या प्रशिक्षणात अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात येते.  ज्येष्ठ रुग्णांची स्वच्छता, त्यांचा आरोग्य दिनक्रम, तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करणे आणि रुग्णांशी संवाद साधणे अशा व इतर प्रकाराचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमात देण्यात येते.  हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालय, सामाजिक संस्था, तसेच परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. येत्या दोन वर्षात  २५० आदिवासी तरुणांना  केअर गिव्हर अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.  आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रुग्ण सेवा करताना आत्मविश्वास मिळवून देईल, संपूर्ण जगात रुग्ण सेवेची मोठी मागणी आहे. या अभ्यासक्रमामुळे भारतातील तरुण परदेशातही रुग्ण सेवा देऊ शकतील, असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले. ‘केअर गिव्हर’ अभ्यासक्रमाप्रमाणेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अशा  वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी सांगितले.
वृद्धांविषयी जिव्हाळा वाटतो.. 
आदिवासी विकास विभागाने तरुणांसाठी सुरु केलेल्या केअर गिव्हर अभ्यासक्रमामुळे आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणकाळात रुग्णसेवा करताना वृद्धांविषयी जिव्हाळा निर्माण झाला आणि त्यातून रुग्णसेवा करण्यास अधिक प्रवृत्त होत असल्याचे  दिंडोरी तालुक्यातील वणी येथील आकाश चारोसकर याने सांगितले.
नोकरी करणारी कुटुंबातील पहिलीच मुलगी 
आमच्या कुटुंबात नोकरी करणारी मी पहिलीच मुलगी आहे. वडिलोपार्जित शेती असल्यामुळे रोजगारासाठी दुसरा पर्याय नाही. मात्र या अभ्याक्रम उत्तीर्ण झाल्यावर नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने आता कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास मदत होणार आहे, असे   सुरगाणा तालुक्यातील जहुले येथील सुनंदा गवळी हिने सांगितले.
गावात रुग्णसेवा करण्याची संधी
केअर गिव्हर अभ्यासक्रमामुळे दुर्गम भागात रुग्ण सेवा मिळवून देण्यात मदत होणार आहे. या रुग्णसेवेविषयी प्रात्यक्षिक ज्ञान मिळाल्याने कठीण परिस्थितीत रुग्णसेवा देण्यास उपयोग होणार आहे, असे पेठ तालुक्यातील उंबरदहाड येथील पार्वता कुंभार हिने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *