ग्राहकांना दिलासा, आवडीचे चॅनल निवडण्यासाठी मुदतवाढ

अर्थसत्ता

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने ग्राहकांना दिलासा देत आवडीचे चॅनल निवडण्याची मुदत वाढवली आहे. आवडीचे चॅनल निवडण्यासाठी आता ट्रायने ३१ मार्च ही नवी डेडलाईन दिली आहे.

यापूर्वी ट्रायने ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी १ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, केबल सेवा असलेले ६५ टक्के ग्राहक आणि डीटीएचच्या केवळ ३५ टक्के ग्राहकांनी आपल्या आवडत्या वाहिन्यांची निवड केली असल्याची माहिती ट्रायने दिली. अनेक जणांना नव्या नियमांनुसार टीव्ही चॅनलचे पॅक कसे निवडावे याबद्दल माहिती नाहीये किंवा संभ्रम आहे. परिणामी, ट्रायने ‘व्यापक जनहिताचा विचार करून ज्या ग्राहकांनी आपले चॅनल निवडलेले नाहीत त्यांना त्यांच्यासाठी योग्य असलेल्या पॅकमध्ये (बेस्ट फीट प्लॅन) समाविष्ट केले जावे किंवा जोपर्यंत ग्राहक आपले चॅनल निवडत नाहीत किंवा त्यांना इतर योग्य पॅकमध्ये समाविष्ट केले जात नाही तोपर्यंत सध्या ग्राहकाचा सुरु असलेला पॅकच सुरू ठेवावा, असे आदेश दिले आहेत.

‘बेस्ट फिट प्लॅन’ कसा?

कुठल्या वाहिन्या निवडायच्या यामुळे गोंधळात असलेल्या ग्राहकांसाठी बेस्ट फिट प्लान तयार करण्याचे आदेश ट्रायने डीटीएच ऑपरेटर आणि स्थानिक केबलचालकांना दिले आहेत. त्यात ग्राहकांकडून सर्वसाधारणपणे पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांचा समावेश असेल. एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या, प्रादेशिक भाषेच्या आणि काही वृत्तवाहिन्या अशा एकत्र वाहिन्यांचे मिळून ‘बेस्ट फिट प्लॅन’ पॅकेज तयार करण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत. यामध्ये असलेल्या वाहिन्यांच्या कि मती ट्रायने ठरवून दिल्याप्रमाणेच असणार आहेत.

ही मुदवाढ नसून नव्या नियमानुसार ज्या ग्राहकांनी आतापर्यंत वाहिन्यांची निवड केली नाही, त्यांच्यासाठी वाहिन्यांची निवड करणे सोपे जावे यासाठी ‘बेस्ट फिट प्लॅन’ची घोषणा करण्यात आली आहे. ते तयार करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता ३१ मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. नव्या नियमानुसार प्रक्षेपण १ फेब्रुवारीपासून अमलात येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाहिन्या निवडीचा काळ वाढविला नाही. –  एस.के.गुप्ता, सचिव ट्राय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *