सेवा हाच खरा धर्म

इतर लेख

काही दिवसांपूर्वी मी काही खाजगी कामानिमित्त शिर्डीला गेलो होतो.अर्थात तिथ गेल्यानंतर साई बाबांचे दर्शन घेतल्याशिवाय मी कसा राहणार?माझ्या मनात साईंची प्रतिमा नेहमी एक अशा संताच्या स्वरूपात राहिली आहे जे फाटके कपडे घातलेले आणि डोक्यावर रूमाल बांधलेले साई लोकांच्या मदतीसाठी एका ठिकाण्याहून दूस-या ठिकाणी जात होते.मात्र साई मंदिरात त्यांचे जे रूप पहायला मिळाले ते पाहून माझ्या मनाला मोठा धक्का बसला.फकीर असलेल्या साईंना त्यांच्या भक्तांनी सोन्याने मढवून ठेवले आहे.साई तर असे योगी आणि फकीर होते ज्यांनी प्रेम,सेवा,क्षमा,दान आणि संयमाची शिकवण दिली.त्यांच्या या शिकवणीच त्यांचे भक्त किती पालन करत आहेत हे माहित नाही मात्र त्यांनी साईंना संपत्तीने लादून टाकलेल दिसत.ज्या साईंवर त्यांचे भक्त आज लाखो रूपये खर्च करत आहेत ते तर एका लिंबाच्या झाडाखाली राहत आणि भिक्षा मागून गुजराण करत.निदान साईंसाठी भक्तांनी सोन्याचे कपडे बनवले नाहीत एवढच काय ते समाधान.

अमृतसरचे सुवर्ण मंदिर तर चारही बाजूंनी सोन्याने मढविलेले आहे.अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला गुरू नानक आणि शिख गुरूंच्या बलिदानाच प्रतिक मानल जात.गुरू नानक सुद्धा फकीर होते.त्यांनी हिंदू समाजात असलेल्या कुप्रथांचा सदैव विरोध केला.अमृतसरचे हे सुवर्ण मंदिर शिखांचे पाचवे गुरू अर्जुन देवच्या काळात बनविले गेले.अमृतसरच्या या हरमंदिर साहिब मंदिराचा पाया लाहोरचे संत हजरत मियां मीर यांनी रचला होता.काळाच्या ओघात हे हरमंदिर साहिब मंदिर सुवर्ण मंदिरात कधी परिवर्तीत झाल हे कळाल सुद्धा नाही.आज या मंदिराची ओळख या मंदिराच्या सोन्यामुळे होते.काही लोक तर फक्त या मंदिराच सोन पहायला केवळ कुतुहलान जातात.

आज आपण आपल्या जीवनात सर्वात महाग असलेल्या सोन्याला दान करून खूप आनंदी होत आहोत.जर एखाद मंदिर कोण्या राजा-महाराजाच्या स्मृतीपित्यर्थ बनवल गेल असत आणि त्याला सोन्या-चांदीन मढवल गेल असत तर गोष्ट लक्षात येते मात्र फकीरांच्या मंदिराला सोन्यान मढविण्याची बाब काही माझ्या गळ्या खाली उतरत नाही.ही गोष्ट जवळपास सर्वच धर्मात होत आहे आणि फक्त होतच नाही तर जणू काही यासाठी स्पर्धा लागली आहे.सत्यता तर ही आहे की,जे ही धर्मगुरू होवून गेले ते स्वत: एक फकीरासारख राहत असत.

या धर्मगूरूंनी आपल्याला साधेपणा आणि संयमाने राहण्याची शिकवण दिली.कसल्याही मोह-मायेत न अडकता अभावातही सतत आनंदी रहायला सांगितल.त्यांनी तर सतत धन-संपतीचा मोह हे पापाचे कारण असल्याच सांगितल.ही कसली विडंबना आहे की,आपण आपल्या ऐश्र्वर्याच प्रदर्शन करून त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करित आहोत.हा या संतांचा सन्मान आहे की अपमान?संत कबीर सुद्धा खूप साधारण जीवन व्यतीत करीत असत.त्यांच पालन-पोषण ऐका गरिब कुटुंबात झाल.उद्या जर आपण त्यांच मंदिर बनवल तर त्याला सुद्धा सोन्यान मढवून टाकाल.याचा अर्थ असा झाला की,आपण त्यांच्या दोहयांना समजून घेतलच नाही.केवळ त्यांचे दोहे आपल्या घराच्या भिंतींवर रंगवून घेतले मात्र त्यांच्या शिकवणीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्नच केला नाही.

दक्षिणेकडील कित्येक मदिंरांना सोन्यान मढविल गेल आहे. वैलुरचे लक्ष्मीचे गोल्डन मंदिर चेन्नई पासून १२० किमी दूर आहे.सोन्यान सजलेल्या या मंदिराची छटा बघताच बनते.तिरूपती बालाजी आणि शिर्डीच्या साई मंदिराच्या बाबतीत नेहमी ऐकायला मिळत की,अमुक-अमुक व्यक्तीने एवढ सोन वा एवढ चांदी चढवली.सर्वात अगोदर हा प्रश्न विचारायला हवा की,त्या व्यक्तीने एवढा पैसा कमावला कसा,ज्यामुळे तो सोन चढवत आहे?मोठे-मोठे माफिया सुद्धा सोन्याची छत्र चढवत आहेत.अगोदर ही लोक देवासमोर हात पसरवितात आणि जेंव्हा पैसा येतो तेंव्हा त्यापैकी काही देवाला चढवून गर्व करतात.हे अस झाल जस आजकाल लोक राजकिय नेत्यांना मदत करण्यापूर्वी त्यांचा होईल तसा फायदा उठवून कोटयावधी कमावतात आणि निवडणूका आल्या की थोडी देणगी देवून उपकार करतात.

गरिबांची सेवा करा ही प्रत्येक धर्माची मूळ शिकवण आहे.मात्र आपण गरिबांच रक्त शोषून श्रीमंत बनतो आणि नंतर त्यांनाच जेवण,चादर वाटून स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजतो.अनेक ठिकाणी काही शेठजींनी लोकांसाठी धर्मशाळा बनवल्या आहेत.त्यांनी पुण्य कमावण्यासाठी ईतर काही समाजसेवेची कामे ही केली आहेत.आता त्यांचीच मुलं या धर्मशाळा तोडून त्याच रूपांतर शॉपिंग काँम्पलेक्स मध्ये करून दूकाने काढत आहेत.त्यांचा हेतू केवळ स्वत:साठी पैसे बनवणे हा आहे.अगोदर लोक संपत्ती कमावत मात्र त्या संपत्तीपैकी काही संपत्ती ईतरांच्या,समाजाच्या कामी कशी येईल यासाठी ते प्रयत्न करत.मात्र ही भावना आज लुप्त होत आहे.कधी काळी अनेक शाळा आणि महाविद्यालय समाजसेवी संस्थांनी समाजासाठी काढल्या होत्या.मात्र आता अस होताना दिसत नाही.एक प्रकारचा व्यक्तीवाद आला आहे.प्रत्येक जण स्वत:पुरताच विचार करतोय.समाज हा कुणाची प्राथमिकता नाही.

महापुरूषांनी दाखवलेल्या मार्गावर न चालता केवळ सोन्या-चांदीन मंदिरांना मढवून समाज सेवा करण्याची ही रित चिंताजनक आहे.यामुळे धर्म व्यापारात परिवर्तीत होत आहे.धर्माची सामाजिक भूमिका जवळपास संपत चालली आहे.जर ईश्वराच्या प्रती खरी श्रद्धा आणि सेवेची भावना आपल्यात आहे तर आपल्याला संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालाव लागेल.हे आपण समजून घेतल पाहिजे की,वंचितांची मदत करणे हे मंदिर आणि मुर्त्यांवर सोन मढविण्यापेक्षा योग्य आहे.

-सुरेश मंत्री,अंबाजोगाई

संपर्क:- ७०२००३३०८५  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *