बाल लैंगिक शोषणाच्या मुक्तीच्या दिशेने..

इतर लेख

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) भारतामध्ये जगातल्या सर्वाधिक लैंगिक शोषित मुलांची संख्या आहे. प्रत्येक १५५ मिनिटामध्ये १६ वर्षाच्या आतील बालकावर बलात्कार होतो. तर दररोज बाल लैंगिक शोषणाचा एक तरी गुन्हा नोंदवला जातो.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो २०१५ च्या आकडेवारीनुसार लहान मुलांविषयी एकूण ९४,१७२ अपराध नोंदवले गेले आहेत. त्यातील १९,७६७ मुलांची लैंगिक हिंसा केली गेली ज्याचे प्रमाण मुलांविरुद्धच्या सर्व गुन्ह्यांमध्ये ३६.२% एवढे आहे. कौटुंबिक शोषणाच्या एकूण घटनांपैकी ५४.५% घटना बालकांच्या बाबतीत घडतात व यात महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. बाल लैंगिक शोषण हे प्रामुख्याने स्पर्शित व अस्पर्शित ह्या दोन प्रकारांमध्ये होत असते. मुलाच्या शरीराला ताकदवान व्यक्तीने लैंगिक संतुष्टीच्या इच्छेकरिता कुरवाळणे, मुलांसोबत अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे. तसेच मोबाईल किंवा इतर माध्यमातून मुलांना अश्लील साहित्य दाखवणे, मुलांशी लैंगिक भाषेत बोलणे तसेच मूल अंघोळ करत असताना किंवा कपडे बदलत असताना वाईट नजरेने पाहणे, अशा वाईट गोष्टी तात्काळ रोखणे गरजेचे आहे आणि तसे झाले नाही तर लहान मुलांवर या लैंगिक शोषणाचे दूरगामी परिणाम होताना दिसतात. मुलांना मानसिक आजार जाणवणे, तसेच मुलांच्या मनात भविष्यात पुन्हा आपले शोषण होईल अशी भीती राहणे, समाजापासून दूर होणे, अयोग्य किंवा प्रमाणाबाहेर लैंगिक वर्तन करणे, कोणावरही विश्वास ठेवण्यास असमर्थ, अनेक व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवणे अश्या समस्यांमुळे बाल वयातच मुले नैराश्याच्या जाळ्यात ओढली जातात.अर्पण ही सामाजिक संस्था २००६ पासून मुंबई, ठाणे, पालघर अशा विविध जिल्ह्यांमध्ये पसरली आहे. तसेच भारताच्या विविध राज्यांमध्ये बाल लैंगिक शोषण ह्या समस्येचे निराकरण करण्याचे कार्य ही संस्था करते. बाल लैंगिक शोषण हा असा विषय आहे, ज्याबद्दल मुलांसोबत चर्चा करणे कठीण जाते. बऱ्याचदा त्यांना हे वास्तव स्वीकारणे कठीण जाते. त्यामुळे, अर्पण लहान मुले, किशोरवयीन मुले आणि प्रौढ ह्यांना बाल लैंगिक शोषणाविषयी प्रतिबंधात्मक कार्यक्रम, उपचार आणि प्रशिक्षण ह्याद्वारे सक्षम बनवते. वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाचे कौशल्य शाळेमध्ये शिकवणे हे अर्पणचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. बाल लैंगिक शोषण म्हणजे लहान मुलांच्या असहाय्यतेचा आणि दुबळेपणाचा गैरफायदा घेऊन ताकदवान व्यक्तींकडून केले गेलेले शोषण होय.मार्च २०१८ पर्यंत, अर्पणने वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमाद्वारे १७३ शाळा, २१ वस्ती आणि ६ संस्थांमध्ये जाऊन १,०४,००० पेक्षा अधिक मुलांना स्व-सुरक्षेसाठी सशक्त केलेले आहे. तसेच ह्या कार्यक्रमाद्वारे ५,७०० पेक्षा अधिक मुलांना तज्ज्ञ समुपदेशकांच्या (काउंन्सलर) टीम तर्फे समुपदेशन मिळाले आहे. भारत महिला व बाल विकास मंत्रालयाच्या बाल शोषणाचा अभ्यास २००७ च्या अहवालाप्रमाणे लैंगिक शोषण हे अधिकांश १० ते १५ वर्ष वयोटातील मुलांसोबत होते. त्यामुळे बऱ्याचदा सदर गुन्हांची नोंददेखील होत नाही कारण मुले बहुधा ह्याविषयी कोणाशी बोलत नाहीत.
अर्पण या संस्थेमार्फत मुलांमध्ये जागरूकता आणण्यासाठी मुलांना वैयक्तिक सुरक्षेचे शिक्षण दिले जाते .यामधून त्यांच्यातील नेतृत्व गुण, धाडसी वृत्ती ह्या कौशल्यांचा विकास व्हावा आणि ते स्वत:च्या शारीरिक, मानसिक व सामाजिक बाबतीत योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनावीत याकरिता वैयक्तिक सुरक्षा शिक्षण, समुपदेशन ह्यावर या संस्थेमार्फत विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सदर विषयावर सत्रे घेतली जातात.
• मुलांसोबत सुरक्षित आधार असलेले पालक, शिक्षक आणि इतर संबंधित अशा घटकांना आवश्यक ज्ञान देणे

• मुलांसोबत संभाषण कौशल्य वाढवणे.

• मुलांमध्ये स्व-जाणीव,आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपल्यावरील अन्याय सांगणे अशी कौशल्ये वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात

• मुलांच्या शरीराच्या खाजगी अवयवांना स्पर्श करणे, त्याकडे पाहणे, त्याविषयी बोलणे किंवा मुलांना आपल्या खाजगी अवयवांना स्पर्श करण्यास सांगणे हे चुकीचे प्रकार आहेत. जर असे प्रकार मुलांसोबत घडत असतील तर मुलांनी नाही म्हणून तिथून निघून जाणे व विश्वासू व्यक्तीची भेट घेऊन त्यास घडलेला प्रकार सांगणे महत्वाचे आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक मुलांसोबत पूर्ण वेळ राहू शकत नाही म्हणून पालकांनी मुलांना त्या विषयीचे शिक्षण, वैयक्तिक सुरक्षेची कौशल्ये शिकून अनैतिक प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. यासाठी अर्पण, पालक व शिक्षक ह्यांना सोबत घेऊन मुलांना चर्चात्मक व खेळात्मक पद्धतीने माहिती देते. यासाठी अर्पणने प्रशिक्षकांसाठी वैयक्तिक सुरक्षा शिक्षण प्रशिक्षण किट तयार केले आहे ह्यात प्रामुख्याने समाविष्ट असलेल्या बाल लैंगिक शोषण: प्रतिबंध आणि प्रतिक्रिया, अर्पणची वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाची पाठ योजना मार्गदर्शिका अशा माहितीपर व मनोरंजनात्मक पुस्तकांतून गोष्टी, कथा व खेळाच्या माध्यमातून वैयक्तिक सुरक्षेचे धडे दिले जातात. अर्पणची टीम विविध शाळा जाऊन या सुरक्षा किटच्या साहाय्याने मुलांसोबत खेळात्मक चर्चा घडून आणते व मुलांमधील या समस्येचे निराकरण करते. जर पालकांना आपल्या पाल्यास हे शिक्षण द्यावयाचे असल्यास तुम्ही अर्पण च्या www.arpan.org.in या वरून शिकवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *