रॉबर्ट वड्रा यांच्या चौकशीच्या प्रश्नावर प्रियंका गांधी म्हणाल्या…

राजकारण

काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नेमणूक झाल्यानंतर प्रियंका गांधी वड्रा या राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाल्या आहेत. मंगळवारी त्या लखनऊमध्ये काँग्रेस समितीच्या बैठकीला उपस्थित होत्या. बैठकीतून निघाल्यानंतर माध्यमांनी त्यांना रॉबर्ट वड्रा यांच्या सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) सुरु असलेल्या चौकशीसंबंधी प्रश्न विचारला त्यावर त्यांनी या गोष्टी सुरु राहतील. मी माझे काम करत आहे अशी प्रतिक्रिया दिली. ईडीकडून रॉबर्ट वड्रा यांच्या सुरु असलेल्या चौकशीचा तुमच्यावर परिणाम होत आहे का ? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी या गोष्टी सुरु राहतील. मी माझे काम करत आहे असे उत्तर दिले. मी सध्या पक्ष संघटना त्याची रचना याबद्दल भरपूर काही शिकत आहे. पक्षात काय बदल करावे लागतील त्याचाही विचार सुरु आहे. निवडणूक कशी लढवावी याबद्दल मी काँग्रेस कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेतले असे प्रियंका गांधी यांनी सांगितले. प्रियंका गांधी यांचा सोमवारीच लखनऊमध्ये भव्य रोड शो झाला. यावेळी त्यांचे भाऊ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्यासोबत होते. प्रियंका यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. उत्तर प्रदेशातून जास्तीत जास्त जागा निवडून आणणे हे काँग्रेससाठी मोठे आव्हान आहे. कारण उत्तर प्रदेशात काँग्रेसची पक्ष संघटना तितकी मजबूत नाही. निवडणुकीसाठी नव्याने बांधणी करावी लागेल. त्यामुळे प्रियंका गांधी यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. सध्या आर्थिक अफरातफर प्रकरणात प्रियंका यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *